Ticker

6/recent/ticker-posts

मराठा समाजाने आता मागणारे नव्हे, देणारे बनावे


जालना / संतराम जाधव

मराठा समाजाने आता मागणारे नव्हे, देणारे बनावे

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर ऑल इंडिया पँथर सेनेचा सरकारला इशारा

अंतरवाली सराटी, दि. ६ सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटी येथे भेट घेत ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा देण्यात आला.


यावेळी बोलताना ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, मराठ्यांची मते घेऊन आता सरकारने हात वर केले असून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात संस्थात्मक पातळीवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीचे भान सरकारने ठेवले पाहिजे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


मराठा समाजाने स्वतःचा राजकीय पक्ष उभारल्यास समाज मागणारा न राहता देणारा बनू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रस्थापित राजकीय शक्ती एकत्र येऊन विस्थापितांच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.


डीजे बापट प्रकरणाचा वापर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला माध्यमांमधून दूर करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सामाजिक मागासलेपणाच्या न्यायासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या लढ्यात आपण कायम सहभागी राहिलो असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


आंदोलन संपविणे, सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकणे आणि सत्तेचा धाक दाखविणे, ही लोकशाहीसाठी दुर्दैवी बाब असल्याचे सांगत सरकारने आंदोलनाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करण्यात आली.


निवडणुकीच्या काळात मराठा समाजाच्या नेत्यांशी जवळीक साधणारे अनेकजण आज साधी भेट घेण्यासही पुढे येत नसल्याची टीका करत, “निवडणुका नाहीत म्हणून नाटक करू नका. जनतेची ताकद मोठी आहे,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.


येत्या काळात मराठा, दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाज एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो, असा दावा करण्यात आला. मराठा समाजाची नवी राजकीय वाटचाल सुरू होऊन समाजाने मागणाऱ्याऐवजी देणारा घटक बनावे, असे आवाहनही करण्यात आले.


दरम्यान, ऑल इंडिया पँथर सेनेने सरकारला इशारा देत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण व आंदोलनाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments